राम रहीमची जन्मठेपेची शिक्षा रद्द; पत्रकार हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता; नेमके प्रकरण काय?

Foto
नवी दिल्ली   : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शनिवारी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केले. विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सात वर्षांहून अधिक काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याला निर्दोष सोडण्यात आले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुरमीत राम रहीम सिंग यांचे सिंग आणि इतर तीन जण कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल यांना २०१९ मध्ये सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले होते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. डेरा प्रमुखाने या निकालाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

नेमकं प्रकरण काय?

पत्रकार रामचंद्र छत्रपती पूरा सच हे वृत्तपत्र चालवत होते, त्यांची ऑक्टोबर २००२ मध्ये हरियाणातील सिरसा येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या प्रकाशनात डेरा सच्चा सौदा मुख्यालयात महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप करणारे एक निनावी पत्र प्रकाशित झाल्यानंतर हा हल्ला झाला.

आजच्या घडामोडींना दुजोरा देताना, गुरमीत राम रहीम सिंग यांचे वकील जितेंद्र खुराणा यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने खून खटल्यातील शिक्षा रद्द केली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या खून प्रकरणात न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे, असे खुराणा म्हणाले.

खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही, गुरमीत राम रहीम सिंगला २०१७ मध्ये त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. त्या शिक्षेनंतर, त्याला हरियाणाच्या रोहतकमधील सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले होते.

२०१७ मध्ये दोषी ठरवण्यात आल्यापासून त्याला १४ वेळा पॅरोलवर सोडण्यात आले होते. सिरसा येथे मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. हरियाणामध्ये, सिरसा, फतेहाबाद, कुरुक्षेत्र, कैथल आणि हिसारसह अनेक जिल्ह्यांमध्ये डेराचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत.