मुंबई: राज्यात आंबेडकरी राजकारणाला फुटीचा शाप असल्याचं मागील काही दशकांपासून पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे असंख्य गट झाल्याने आंबेडकरी राजकारणाचा आवाज दिवसेंदिवस क्षीण होत गेल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार घेतला असून आठवले यांनी सोशल मीडियावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी हात पुढे केला आहे.
रामदास आठवले यांनी आपल्या एक्स हँडलवर प्रकाश आंबेडकर यांचा फोटो पोस्ट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आंबेडकरी एकतेसाठी आपण एकत्र यायला हवं, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. आठवले यांनी पुढाकार घेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजकीय युतीसाठी हात पुढे केल्याने या आवाहनाला प्रकाश आंबेडकर सकारात्मक प्रतिसाद देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आठवले नेमकं काय म्हणाले?
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन करताना लिहिलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक कदम महाबोधि महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपने के लिए...महाबोधी की मुक्ति की है पुकार, आंबेडकरी एकता हो अब आधार, टूटे रिश्तों को जोड़ने चला, बाबासाहेब का सपना फिर से खिला, असे म्हणत आठवले यांनी आंबेडकरी एकतेची गरज अधोरेखित केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही रामदास आठवले यांनी आंबेडकरी एकतेची गरज बोलून दाखवली होती. मात्र तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस शब्दांत त्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा आठवले यांनी मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेत बदल होऊन ते सकारात्मकता दर्शवतात का, हे पाहावं लागेल.