कोयत्याने जीवघेणा हल्ला : गावठी कट्टा लॉक झाल्याने अनर्थ टळला; दोन जणांना बेड्या
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी ते म्हाडा कॉलनी दरम्यान शुक्रवारी (दि. १९) दुपारी गांजाच्या नशेत धुंद असलेल्या एका गुन्हेगारी टोळक्याने भररस्त्यात कोयता, चाकू आणि गावठी कट्ट्यासह धुमाकूळ घातला. शिवजयंतीला नाचू न दिल्याच्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी या टोळीने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, हल्लेखोरांच्या टोळीतील एका अल्पवयीन मुलाने थेट गावठी कट्टा काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने ऐनवेळी कट्टा लॉक झाल्याने गोळी सुटली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपींनी पोलीस ठाण्यातही दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.
संघपाल रितेश वाटोडे, हर्षवर्धन इंगोले,
पोलिस ठाण्यात दादागिरी
अशी अटक आरोपींची नावे आहेत त्यांना न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी तातडीने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली व शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ते ठाण्यातच तळ ठोकून होते. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, ठोकून उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, दिलीप बचाटे, नंदकुमार भंडारे, जयसिंग वाघ, अंमलदार सुनील बेलकर यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी सुमित घोडके याच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात संघपाल वाटोडे, एका अल्पवयीन आरोपीसह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.
हर्षवर्धन इंगोले
संघपाल वाटोडे
संघपालकडून गँग बनवण्याचा प्रयत्न
मुख्य आरोपी संघपाल वाटोडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हाफ मर्डरचा आहे. सातारा भागात दहशत निर्माण करण्यासाठी तो नवीन गँग तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहितीही समोर आली आहे.
रीलवरून आरोपींचा शोध
▶ अल्पवयीन गुंडांच्या हातात गावठी कट्टा आला कुठून? याचा तपास करत असताना 'लब्बा' नावाच्या आरोपीकडून त्यांनी हा कट्टा विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. या गुंडांनी हाती कट्टा पडताच सोशल मीडियावर त्याची 'रील' बनवून टाकली होती. या रीलमध्ये दिसणाऱ्या इतर आरोपींचीही पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
अल्पवयीन मुलाचे कोयत्याने वार
▶ फिर्यादी सुमित घोडके (वय १९) आणि त्याचे मित्र दुचाकीवरून जात असताना संघपाल वाटोडे, एक अल्पवयीन आरोपी आणि त्यांच्या ५-६ साथीदारांनी त्यांना हायकोर्ट कॉलनीजवळ गाठले. आरोपींच्या हातातील शस्त्रे पाहून जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेल्या सुमितचा या टोळक्याने म्हाडा कॉलनीपर्यंत पाठलाग केला. तिथे सुमितचा भाऊ प्रशांत घरातून बाहेर आला असता, अल्पवयीन आरोपीने प्रशांतवर कोयत्याने वार केला. प्रशांतने आपला डावा हात मध्ये घातल्याने तो थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. संघपाल वाटोडे याने गावठी कट्टा काढला आणि तो लोड करत असतानाच त्याच्या हातातून तो खाली पडला. कट्टा खाली पडताच सुमितच्या मित्रांनी संघपालला पकडले. मात्र, संघपालने चाकू काढल्यामुळे त्याला नाईलाजाने सोडावे लागले. या झटापटीत अल्पवयीन आरोपीकडेही एक पिस्टल असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे.
▶ गुन्हा करण्यापूर्वी मुख्य आरोपी संघपाल याने त्याच्या साथीदारांसह गांजाची नशा केली होती. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक करून पोलिस ठाण्यात आणले तेव्हाही तो गांजाच्या नशेतच होता. ठाण्यातच तो पोलिसांना दादागिरीची भाषा करत होता.













