वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : औद्योगिक विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने प्रभावी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. ग्रामपंचायत आणि नागार्जुन एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा हा उपक्रम गावासाठी दिशादर्शक ठरत आहे.
ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई पाटील यांच्या पुढाकाराने प्रशासक अशोक घोडके, दीपक बडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तू भाऊ हिवाळे, कीर्तीकर दाजी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अभियानाला सुरुवात झाली आहे. नागार्जुन ट्रस्टच्या संचालिका किरण बोराडे, संचालक साहिल तुरकर आणि किशोर म्हस्के यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सलग १५ दिवस बेसलाइन सर्वेक्षण, जनजागृती आणि मॉनिटरिंग करण्यात आले. नागार्जुन स्वच्छता टीमने गावातील कचरा साचणारी ठिकाणे (हॉटस्पॉट) शोधून काढली.
त्यानंतर घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. त्यामुळे यापूर्वी कचऱ्याचे ढीग दिसणाऱ्या ठिकाणी आता स्वच्छता दिसून येत आहे. अभियानाच्या पुढील टप्प्यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे नियोजन आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार असून, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट अधिकृत रिसायकलर्सच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे.
वैजापूर नगरपरिषदेच्या धर्तीवर राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरू शकतो. लोकसहभाग आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या जोरावर रांजणगाव शेणपुंजी स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.















