सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकल्या होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. त्यानंतर महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं. हा छळ पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी होत असल्याचे महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी सांगितले.
महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागला आहे.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहील्याचे म्हटले जात आहे. पीएसआय गोपाल बदनेने चारवेळा बलात्कार केल्याचे या महिलेने हातावर नमूद केले आहे. आपल्यावर बलात्कार झाला असे मृत डॉक्टरच्या असा मजकूर लिहिलेला आढळला आहे. माझ्या मरण्याचे कारण गोपाल आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला 4 महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असं या महिला डॉक्टरच्या हातावर लिहील्याचे आढळून आले आहे.
मला आत्तापर्यंत या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून कळलेले नाही. मी पोलीस अधिक्षकांशी बोललो आहे की, तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जा. तेथे सुसाईड नोट वगैरे काही आढळली असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणात खोलवर तपास करू. या प्रकरणातील सर्व पुरावे गोळे करू. मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि याचा तपास देखील पोलीस करणार आहेत, अशी माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पीएसआय बदने आणि बनकर या दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, फलटण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
दरम्यान याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अशा अनेक केसेस आतापर्यंत आलेल्या आहेत. विशेषत: पुणे, ठाणे आणि मुंबईतील काम करणाऱ्या महिला पोलिसांनाही अशाच प्रकारे त्रास दिला जातो. जर अशा पद्धतीने विभागात काम करणाऱ्या महिलाही सुरक्षित राहत नसतील तर आम्ही ज्यांच्या हातात हे गृहखातं आहे त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या. याला त्यांनी उत्तर द्यायला हवं. तुम्ही आता कितीही चौकशी करा, एक जीव गेला. याची काळजी जर आधीच घेतली असती, तीन महिन्यांपासून तिला त्रास दिला जात होता. अजून धक्कादायक खुलासे पुढे येतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.