रॅपिडोच्या सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी चालकांचा आज बंद

Foto
मुंबई : राज्यभरतील रिक्षा संघटनांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. परिणामी आज मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही, असा दावा या रिक्षा संघटनांनी केला आहे. राज्यात सुरु असलेल्या रॅपिडोच्या सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा करत रिक्षा संघटनांनी हा बंद पुकारला आहे. अशातच या बंदला मुंबई, पुणे ठाणे, कोल्हापूर,नाशिकसह इतर जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे. मात्र या संपामुळे आज (सोमवारी) चाकरमान्यांची काहीशी गैरसोय होणार असल्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा सेवा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. रॅपिडोच्या सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा करत रिक्षा संघटनांनी हा बंद पुकारला आहे. मात्र, मुंबईच्या उपनगरांमध्ये या बंदचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचं चित्र आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने रिक्षा सुरू असून प्रवासीही नेहमीप्रमाणे रिक्षाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे रिक्षा संघटनांनी बंदची हाक दिली असली, तरी मुंबईत मात्र रिक्षा सेवा सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या रिक्षा बंद आंदोलनाला पुण्यातील रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र शाळकरी विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सकाळी रिक्षा वाहतूक सुरू ठेवली आहे. तर १० नंतर रिक्षा बंद आंदोलनात रिक्षाचालक सहभागी होतील. आम्हाला भाडं मिळत नाही, खाजगी कंपन्या यांना सगळे पैसे मिळतात. त्यामुळे आम्ही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितले. रिक्षा बंद आंदोलनाचा पुण्यात काही प्रमाणात परिणाम दिसून येतोय. रिक्षा संघटनांनी राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाला पुण्यातील रिक्षा संघटना देखील पाठिंबा दर्शवला आहे. मात्र संपात सहभागी होउन रिक्षा बंद ठेवायच्या की नाही याचा निर्णय त्या त्या संघटनेवर सोपवण्यात आलाय. अशातच रिक्षा संघटनांकडून पुण्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ तर पिंपरीमधे विधान षरिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात मात्र रिक्षाचालकांचा बंद नाही
छत्रपती संभाजीनगर शहरात बंद नाही. मात्र  अनुचित प्रकार घडू नये. कोणाला काही होऊ नये काळजीपोटी रिक्षा रस्त्यावर काहींनी चालविली नाही. आमचा आज रिक्षाचालकांचा बंद नाही. असे भारतीय मजदूर संघ संलग्न रिक्षाचालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले. तसेच मागण्या मात्र कायम आहे. त्यात रॅपिडोवर बंदी आणावी, तसेच रिक्षाचालकांसाठी महामंडळ तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी नाही. तसेच ओळखपत्र देण्यात येणार होते त्यासाठी रिक्षाचालकांनी आठशे रुपये देखील भरले आहे. पावती दिल्या मात्र प्रत्यक्षात ओळखपत्र दिले नाही. शेअरिंग रिक्षासाठी दर ठरवून देण्यासाठी एकाही बैठकीत चर्चा झालेली नाही. याशिवाय ई- रिक्षा परवाना नसतानाही चालतात त्यावर देखील नियंत्रण ठेवले पाहिजे. या मागण्या कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांची मात्र हाल
रिक्षाचालकांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही रिक्षा रस्त्यावर आल्या नाही. त्यामुळे तुरळक रिक्षा रस्त्यावर दिसल्या. त्यामुळे शहरातील प्रवाशांची हाल झाली. त्यात आजपासून शाळा सुरू झाल्याने अनेक पालकांची गैरसोय झाली. तर काही पालकांना स्वतःच विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन सोडावे लागले. तर काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच टाळले.