छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी न्यायालयात जबाब देत पोलिसांनाच धक्का दिला. पोलिसांकडून आम्हाला मारहाण केली जात आहे, असा आरोप मुख्य संशयित विशाल राठोड आणि आकाश पवारने मंगळवारी (दि.१७) न्यायालयात केला. आरोपींच्या या दाव्यामुळे न्यायालयीन सुनावणीत तब्बल पाच तास विलंब लागला.
मुख्य आरोपींच्या आरोपानंतर विशेष न्यायाधीशांनी चेंबरमध्ये नेऊन त्यांची तपासणी केली. त्यानंतर एकाला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. ही प्रक्रिया सुमारे ५ तास चालली. सायंकाळी अखेर न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल राठोडला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आकाश पवारची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी आरोपींना काही तक्रार आहे का, असे विचारले असता विशाल आणि आकाशने पोलिसांविरुद्ध मारहाणीची तक्रार असल्याचे सांगितले. त्यांची दखल घेत न्यायमूर्तीनी आरोपींच्या अंगावर काही व्रण किंवा वळ आहेत का, हे पाहण्यासाठी त्यांना स्वतःच्या चेंबरमध्ये नेले. तपासणीत विशालच्या अंगावर काही आढळले नाही, मात्र आकाशच्या हातावर लालसर व्रण दिसल्याने त्याला मेडिकल करण्यासाठी घाटी रुग्णालयात पाठवले होते. कोर्टात साहायक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.













