रजाळवाडीसह शहरालगतच्या वाड्या - वस्त्यांसाठी विकास आराखडा तयार करा : आमदार अब्दुल सत्तार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड शहरातील रजाळवाडी तसेच शहरालगतच्या वाडी वस्त्यांचा पायाभूत व मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करून प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना विकासकामांसाठी दिल्या. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

नगरपरिषद सिल्लोड अंतर्गत रजाळवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार होते. यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक
नंदकिशोर सहारे, पार्वताबाई दुधे, सुनील दुधे, जितेंद्र आरके, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, पत्रकार प्रा. मन्सूर कादरी, उपमुख्याधिकारी अजगर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रजाळवाडी येथे नव्याने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन नवीन जलकुंभ उभारून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आ. अब्दुल सत्तार यांनी दिल्या. 

रजाळवाडी येथे भूमीगत गटार, रस्ते, पाणी पुरवठा, वीज यासह मूलभूत सुविधांसाठीही प्रस्ताव सादर करून आवश्यक मंजुरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. तसेच रजाळवाडी व शहरालगतच्या वाडी - वस्त्यांमधील एकही पात्र बेघर कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सविस्तर आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे निर्दे श त्यांनी दिले. नागरिकांनी मालमत्तेची खरेदीखत करून नगरपरिषदेत रीतसर नोंद करून घ्यावी, जेणेकरून घरकुलासह इतर शासकीय योजनांचा लाभघेता येईल, इतर योजनेच्या लाभासाठी केवायसी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. रोहिदास दुधे, अमोल कुदळ, फहिम पठाण, विजय साळवे, पंडित साळवे, निकम खोतकर, अजिनाथ दुधे, मधुकर हासे, रोहिदास सागरे, अनिल साळवे, बबन फुले आदीसह रजाळवाडी व परिसरातील नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.