जलविद्युत प्रकल्पा करिता ३ लाख झाडे, १२३५ एकर वन व शेत
जमीन वाचविण्यासाठी वडोद येथे महाराष्ट्र धावून आला
सिल्लोड, (प्रतिनिधी): सह्याद्रीतील भीमा शंकर येथील वृक्षतोड व टोरंटो प्रकल्पामुळे राज्यात निसर्ग प्रेमींमध्ये खदखद आहे. सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन - को एनर्जी, या जलविद्युत म्हणजे हायड्रो थर्मल पॉवर प्रोजेक्ट या पंप स्टोरेज पंप प्रकल्पासाठी डोंगराच्या खालील बाजूची सोयगाव वनक्षेत्र विभागाच्या अभिप्रायानुसार त्यांच्या अखात्यातील सुमारे १ लाख ७३ हजार व वरच्या पट्ट्यातील वडोद विठ्ठलाचे या गावाला लागून असलेल्या रक्ताई डोंगराच्या आजबाजूची सव्वा लाखाच्या आसपास पाणी अशी अंदाजे ३ लाख वृक्ष तोडली जातिल असा वन विभागाचा अंदाज आहे.
सुमारे १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा व २ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा हा प्रकल्प कन्नड व सोयगाव तालुक्याच्या सीमेवर प्रस्तावित असून सोयगाव व कन्नड तालुक्यातील प्रादेशिक वन विभागाची सातशे पन्नास एकर वन जमीन यात बाधित होणार आहे, तर ५०० एकर शेत जमीन यात अधिग्रहित होणार आहे. बरेच शेतकरी हे आदिवासी मिल्ल समाजाचे आहेत.
वडोद विठ्ठलाचे येथील पूर्ण गाव या प्रकल्पाच्या विरोधात आहे तर वाडी, नायगाव, निमचौकी येथील शेतकरी व निसर्ग प्रेमी नागरिक ही हा प्रकल्प होऊ नये म्हणून विरोधात आहे कारण या ठिकाणी प्रचंड वृक्ष तोड होणार असल्याने परिणामी स्थानिक जैव विविधता नाश होऊन, पर्जन्य मान कमी होणे, वन्यजीव व मानवी संघर्ष निर्माण होणे, पाण्या वरचा हक्क गमावणे, डोंगरात ब्लास्टिंग केल्याने डोंगर, दरड कोसळणे, जल प्रदूषण आदी समस्या कायम स्वरुपी निर्माण होतील.
४ गावांनी कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता, कोणाचाही विरोध न करता आदिवासी जन नायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने शांतता मय मार्गाने गावाजवळ एकत्र येत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून वन दिंडी काढली. टाळ मृदुंगाच्या गजरात जेथे जंगल बाधित होणार आहे, तिथे वन दिंडी पोहचली. तेथे जंगला भोवती एकमेकांच्या हातात हात घालून विक्रमी मानवी साखळी उभारून निसर्ग वाचवण्यासाठी शासनाला संदेश देत साकडं घातले. झाड ही प्राणाहून प्रिय असल्याचे दर्शवित १ हजार निसर्ग प्रेमींनी हातात हात घेऊन एक किलोमीटर परिघाची मानवी साखळी उभारली जी ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानवी साखळी समजली गेली असे अजिंठा वन संरक्षण समितीच्या वतीने डॉ. संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.
झाडांना मिठी मारून भवीष्यात गरज पडल्यास चिपको आंदोलनासाठी गावाने तयारी दर्शवली. जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील असंख्य पर्यावरण प्रेमींची यावेळी उपस्थिती होती. लहान मुलांनी वन्य जीवांचे मुखवटे घालून वन्य प्राण्यांच्या रक्षणाचा निर्धार केला.














