छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी महानगरपालिकेच्या करवसुली विभागाने दमदार कामगिरी केली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता आणि पाणीपट्टी या दोन्ही माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण २३२ कोटी ९७ लाख ४१ हजार २९ रुपये जमा झाले. यामध्ये मालमत्ता कराचा वाटा सर्वाधिक आहे.
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त विलास नवाळे यांनी करवसुलीसाठी विविध योजना राबविल्या. त्यानुसार मालमत्ता करापोटी तब्बल २१० कोटी ८२ लाख ९७ हजार ७५४ रुपये वसूल करण्यात आले. १ लाख ४२ हजार ५२० मालमत्ताधारकांनी कर भरला. वॉर्डनिहाय वसुलीची आकडेवारी पाहता वॉर्ड क्रमांक ५ मधून सर्वाधिक ३१ कोटी ८८ लाखांची वसुली झाली आहे, तर वॉर्ड सातमध्ये सर्वाधिक २१,६५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला; तसेच पाणीपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला २२ कोटी १४ लाख ४३ हजार २७५ रुपये मिळाले. सुमारे ३९ हजार ४८३ नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा केला. यामध्ये वॉर्ड सातमधून सर्वाधिक ४ कोटी रुपयांची वसुली झाली.












