मराठवाड्यात रेड अलर्ट; दोन दिवस आठही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Foto
छत्रपती संभाजीनगर :  गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे, मोठ्या पावसामुळे आणि पाण्यामुळे अनेकांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, या नुकसानामुळे नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस धाराशिवमध्ये  झाला असून, आठवडाभरात तेथे 376 टक्के इतका पाऊस झाला आहे. धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अशातच मराठवाड्यात अतिवृष्टीचे सावट आणखी गडद झाले आहे. 

मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी (27 सप्टेंबर) आणि रविवारी (28 सप्टेंबर) या दोन दिवशी विभागातील आठही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ( ) वर्तवली आहे. आज 27 तारखेला सकाळी आठ वाजेपासूनच पावसाला सुरुवात होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला पावसाने झोडपले असून मनुष्यहानीसह, पशुधनहानी आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे.  

कोणत्या तारखेला कोणत्या वेळेत पावसाची शक्यता

27 सप्टेंबर : स. 8 ते 2 वाजेपर्यंत - नांदेड, लातूर
27 सप्टेंबर : दु. 2 ते रात्री 8 पर्यंत - धाराशिव, लातूर, नांदेड
27 सप्टेंबर : रा. 8 ते रा. 12 पर्यंत - धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी
28 सप्टेंबर : रा. 12 ते स. 6 पर्यंत - छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड
28 सप्टेंबर : स. 6 ते दु. 12पर्यंत - छत्रपती संभाजीनगर, बीड
28 सप्टेंबर : दु. 12 ते सायं. 6 पर्यंत - छत्रपती संभाजीनगर

पावसाचा अंदाज कुठे?

मुसळधार ते अतिमुसळधार : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर, धाराशिव 
मेघगर्जनेसह:  धुले, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती,भंडारा, बुलडाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
मुसळधार:  पालघर, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची माघार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी आणखी काही भागातून माघार घेतली. संपूर्ण पश्‍चिम हिमालयीन प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे.