छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): देभेगाव (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या आणि रजिस्टरचे वाटप करण्यात आले. देभेगांव भूषण कैलास भिमराव कुशेर आणि स्टार युथ फाऊंडेशन यांच्या वतीने १२ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
कैलास कुशेर हे मूळचे देभेगांवचे रहिवासी असून नोकरीनिमित्त पवई (मुंबई) येथे स्थायिक आहेत. आपल्या मातृभूमीचे, गावाचे आणि पूर्वजांचे आपल्यावर जे ऋण असतात, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी गरीब व होतकरू मुलांना मदत केली पाहिजे, या प्रामाणिक उद्देशातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष संदिप बोडखे हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून कैलास कुशेर यांची उपस्थिती होती. माजी उपसरपंच नारायण बोडखे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पेन बक्षीस म्हणून दिला. मुख्याध्यापक वनारसे सर यांनी कैलास कुशेर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यशस्वीतेसाठी माजी सरपंच आण्णादादा बोडखे, कवीवर्य का. का. थोरात, पंढरीनाथ बोडखे, जनार्धन बोडखे, अशोक बोडखे, किशोर कुशेर, सागर बोडखे, गौतम कुशेर, दिपक पवार, मुक्ताबाई कुशेर आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जावळे यांनी तर आभार रिंढे यांनी मानले. या प्रसंगी माळवाळ, जोशी, कुमावत, देवकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













