वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार

Foto
नवी दिल्ली  : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महिला शासकीय अधिकार्‍यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांच्याकडून याबाबत भाष्य करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मत शरद पवारांनी मांडले. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत, असल्याची खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली.
 
महिला अधिकार्‍यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन शनिवारी दिल्लीत पार पडत आहे. थोड्याच वेळात ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज तुम्हाला का भासली, यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरुन संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे  ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करुन जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटर सर्व्हिस होती, एसटी नसायची, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले आहेत 
दुसरीकडे वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ६०% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.