स्वीकृत नगरसेवकासाठी नेत्यांचे नातेवाईक सरसावले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी नेत्यांच्या मुलांसह भाऊ-बहिणींनी फिल्डिंग लावली आहे. दहा जागांसाठी ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यात या सर्वांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या १३, एमआयएमच्या ३ इच्छुकांसह शिंदेसेनेचे १५ आणि ठाकरे सेनेचे १५ जणांचा समावेश आहे. आता १ एप्रिल रोजी या अर्जांची छाननी होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत ११५ पैकी सर्वाधिक ५६ नगरसेवक हे भाजपचे विजयी झाले आहेत. त्यानंतर एमआयएमचे ३३, शिवसेनेचे १३, शिवसेना उबाठाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार १० स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. संख्याबळानुसार भाजपला ५ स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहेत. एमआयएमला तीन स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार आहेत. त्यानुसार एमआयएमने तीन जणांची नावे जाहीर केली असून, त्यांनीच सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदेसेनेसह ठाकरे सेनेला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे. मात्र या एका जागेसाठी दोन्ही सेनेकडून प्रत्येकी १५ अशा ३० इच्छुकांनी अर्ज भरले.