छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मनपा हद्दीतील विजेचे खांब, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच कोणत्याही धोकादायक किंवा जोखमीच्या जागेवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, पोस्टर, शुभेच्छा फलक इत्यादी तात्काळ काढून टाका, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला. सर्व संबंधित नागरिक, संस्था, जाहिरातदार व राजकीय पक्ष यांनी अशा प्रकारचे अनधिकृत साहित्य २४ तासांच्या आत स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा संबंधितांवर पुढील कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल : महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ चे कलम ३, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २४४ व २४५, तसेच अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनरमुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती/संस्था यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. महानगरपालिका प्रशासनाने सर्व संबंधितांना नियमांचे पालन करून शहराची सुरक्षितता व सौंदर्य राखण्याचे आवाहन केले आहे.














