मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपूरचे दीक्षाभूमी असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाल्याने हे नामांतर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. दादरच्या नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही नवी मागणी करून सरकारला आव्हान दिले आहे.
दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा गोंधळ कायम असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवीन मागणी केली आहे. नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. सरकारने त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी दादरचं चैत्यभूमी करण्याच्या मुद्द्यावर थेट बोलणं राऊत यांनी टाळलं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाला अभिमान आहे. आत्मीयता आणि श्रद्धा आहे. बाबासाहेबांना सर्वात मोठी श्रद्धांजली कधी ठरेल? दादर छोटं स्टेशन आहे. त्यापेक्षा नागपूरचं नाव बदला. दीक्षाभूमी करा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांती नागपुरातून झाली. हे नामांतर सरकारने केलं, तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंची सूचना
दादरच्या नामांतरावर सरकारने घुमजाव केलं आहे. ही प्रिटिंग मिस्टेक असल्याचं सरकारने म्हटलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार हीच एक प्रिटिंग मिस्टेक आहे. हे सरकारच मिस्टेकने आलं आहे. कोर्ट आता सांगेलच. संविधानाच्या माध्यमातूनच ही मिस्टेक झाली आहे. पण नागपूरला दीक्षाभूमी हे नाव योग्य आहे. नागपूरचं दीक्षाभूमी करा. उद्धव ठाकरेंनी ही सूचना केली आहे. काल ते माझ्याशी बोलले. नागपूरचं नाव दीक्षाभूमी झालं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्यासाठी मोठं स्मारक कोणतं असेल तर इंदू मिल आणि नागपूरचं दीक्षाभूमी होणं. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी बनवावा. कोणी विरोध करणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करू, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
प्रकल्पाची किंमत का वाढली हे सांगावं
बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. भव्य स्मारक व्हावं ही आमची मागणी आहे. पण या स्मारकाच्या प्रकल्पाची किंमत का वाढली हे मी सांगू शकत नाही. टेंडर, धरण, नद्यांच्या टेंडरच्या किंमती वाढतात हे समजतो. पण स्मारकाच्या प्रकल्पाची किंमत वाढत असेल तर त्यावर सरकारने बोलावं, असं ते म्हणाले.
सरकारचं घुमजाव
दरम्यान, राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण चैत्यभूमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आंबडेकरी जनतेत उत्सााहाचे वातावरण होते. राज्यभर जल्लोष करण्यात आला होता. पण दुसर्या दिवशी सरकारने घुमजाव केला. आम्ही दादर रेल्वे स्थानकाचं नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आंबेडकरी जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवर आंबेडकरी कार्यकर्ते सडकून टीका करत आहेत.