औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर
करण्याच्या वादात आता एक नवीन प्रस्ताव समोर आला आहे. औरंगाबाद शहराजवळील
वाळूज-पंढरपूरला महानगर पालिकेचा दर्जा देऊन या नवीन शहराला संभाजीनगर असे नाव
देण्याचा सल्ला माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी दिला आहे. त्यांचा हा सल्ला अनेक
वर्षांपासून शहराच्या नामांतराची मागणी करणाऱ्या शिवसेनेला मान्य होतो का, हे आता
पाहावे लागणार आहे.
काय म्हणाले उत्तमसिंग पवार
औरंगाबाद शहराला ऐतिहासिक आणि जागतिक ओळख आहे.
या शहराचे नाव बदलण्याऐवजी वाळूज महानगराला संभाजीनगर नाव देण्याचा सल्ला माजी
खासदार उत्तमसिंग पवार यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात अनेक शहरांची
नावे बदलण्याचे लोण पसरले आहे. त्यातच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची
मागणी शिवसेनेने लावून धरली आहे, त्यावर उत्तमसिंह पवार बोलत होते.
शहराच्या सौहार्द्यासाठी मध्यम मार्ग
महाराष्ट्र जनजागरण समितीच्यावतीने मुस्लिम
आरक्षणासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार पवार
यांना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासंदर्भात आपली भूमिका काय, असे विचारले असता
ते म्हणाले, ‘औरंगाबाद शहराला ऐतिहासिक ओळख आहे. औरंगाबाद हे
नाव जगाच्या नकाशावर आहे. औरंगजेबची राजधानी असल्यामुळे या शहराला त्यांचे नाव
देण्यात आले होते. त्यांच्या अनेक
ऐतिहासिक वास्तू या शहरामध्ये आहेत. ‘बीबी का मकबरा’ ही ऐतिहासिक वास्तू आहे. हे पुरावे आणि आठवणी कोणालाही
पुसता येणार नाही. त्यामुळे एक मधला मार्ग यात काढता येऊ शकतो आणि दोन्ही समाजात
सलोखा कायम ठेवता येऊ शकतो. ’
माजी खासदार पवार यांनी वाळूज-पंढरपूर या
महानगराला संभाजीनगर असे नाव देऊन नवीन महापालिका तयार करण्याचा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले, ‘ खासदार खैरे यांना वाईट वाटेल परंतू शहराच्या
शांततेसाठी मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे. औरंगाबादच्या जवळच वाळूज महानगर झाले
आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. वाळूज, पंढरपूरची लोकसंख्या झपाट्याने
वाढत आहे. वाळूज-पंढरपूर महापालिका करुन या शहराला संभाजीनगर नाव दिले पाहिजे. यामुळे
शहराला १० हजार कोटी रुपयांचा निधी येऊन मोठ्या प्रमाणात विकास कामे करता येतील
आणि शहराची शांतता, सौहार्द्य कायम राहिल.’ उत्तमसिंग पवार
यांचा सल्ला शिवसेनाला मान्य होणार का हे पाहाणे आता औत्सूक्याचे आहे.















