मनपा आयुक्तांनी लावलेला पी १, पी २ चा नियम तातडीने रद्द करावा, लाईट बिल तसेच विविध करांतून सूट द्यावी, अशी मागणी करीत औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने आज पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, माजी अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा, सचिव लक्ष्मीनारायण राठी, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, विजय जैस्वाल, संजय कांकरीया आदींची उपस्थिती होती.
मनपा आयुक्तांनी शहरात दुकाने उघडी ठेवण्यासाठी पी१, पी२ चा नियम लावून दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्याचबरोबर थर्मल गन आणि ऑक्सि मीटरची सक्ती केली जात आहे. त्यामुळे छोटे दुकानदार हैराण झाले आहेत. गेल्यात तीन महिन्यांपासून लॉक डाऊन मुळे व्यापार बंद असल्याने मोठे नुकसान झाले आहे. व्यापारी अडचणीत आले आहेत. शासनाने वीज बिलात सवलत द्यावी, त्याचबरोबर इतर कर लावू नयेत, विज बिल भरण्याला सहा महिनाची सवलत द्यावी. २०२०-२१ या वर्षाचा चा टॅक्स माफ करावा, मालमत्ता करात सूट द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.