किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व आहार सवयींचा संशोधनातून अभ्यास

Foto
प्राध्यापक डॉ. प्रतिभा आघारडे यांच्या पुढाकाराने उपक्रम

सिल्लोड, (प्रतिनिधी): किशोरवयीन आहाराच्या मुलींच्या आरोग्यावर त्यांच्या सवयींचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी व्यापक आरोग्य तपासणी व संशोधन उपक्रम राबविण्यात येत आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत चिंचोली लिंबाजी येथील कला व विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. प्रतिभा आधारडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यालयांतील किशोरवयीन विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयातील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये हिमोग्लोबिन, जीवनसत्त्व डी, बी - १२, कॅल्शियम, प्रथिने आदी घटकांची तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींना संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

संशोधनाचा भाग म्हणून विद्यार्थिनींकडून लेखी प्रश्नावलीही भरून घेण्यात आली. त्यामध्ये दिवसातन किती वेळा जेवण व नाश्ता केला जातो, कोणते पदार्थ सेवन केले जातात, दुग्धजन्य पदार्थ, फळे, हिख्या व पालेभाज्या, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये यांचा आहारातील समावेश, जंक फूडचे सेवन, पाणी पिण्याच्या सवयी, हात धुण्याच्या पद्धती, भूक, आवडी निवडीचे पदार्थ तसेच सर्वांगीण आहार याबाबत प्रश्न विचारण्यात आले. 

याशिवाय पालकांकडून आहाराबाबत दिले जाणारे मार्गदर्शन, सलाडचे सेवन, थकवा, चक्कर, वारंवार होणारे आजार, वजन, उंची, पचनक्रिया, रक्तक्षय, मासिक पाळीच्या काळातील त्रास व शारीरिक बदल आदी बाबींचीही माहिती घेण्यात आली.

यावेळी अशोकदादा गरुड शैक्षणिक समूहाच्या ज्ञानविकास विद्यालय, भराडीचे मुख्याध्यापक रायभान जाधव, बेबी भडगे, संदीप खडोळ, गणेश ठोंबरे आणि सागर पंडित यांनी सहभाग नोंदविला. हे संशोधन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी बोरीकर यांच्या नियोजनातून होत आहे. 

संकलित माहिती व तपासणी अहवाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. तळागाळातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी हा संशोधन उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 या संशोधनातून किशोरवयीन मुलींमधील अॅनिमियाचे प्रमाण, कॅल्शियमची पातळी आणि बीएमआय यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. आहार व आरोग्यविषयक माहिती तसेच रक्त तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे मुलींच्या आरोग्यस्थितीचे विश्लेषण केले जाणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या आढळलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांशी संवाद साधून आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. 

या संशोधनामुळे किशोरवयीन मुलींमधील कुपोषणाची समस्या आणि त्यातून निर्माण होणारे आरोग्यविषयक प्रश्न समजून घेण्यास मदत होईल. तसेच भविष्यात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासंदर्भात शासनाला योजना व उपाययोजना आखताना संशोधनाचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे. तपासणीची प्रक्रिया नेवपूर येथील देशमुख लॅबचे आकाश धोत्रे यांनी राबविली.