राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर, छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण तर मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिला

Foto

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. या सोडतीत छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद सर्वसाधारण झाले आहे.

50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे

मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झाले होते.

पुढील प्रक्रिया काय?

आजच्या आरक्षण सोडतीनंतर आता 15 दिवसांच्या आत महापौर निवडीसाठी विशेष सभा बोलावल्या जातील. ज्या शहरांत खुला प्रवर्ग (महिला) असे उप-आरक्षण पडले आहे, तिथे केवळ महिलांना संधी मिळेल, तर उर्वरित ठिकाणी चुरस अधिक असेल. दरम्यान मुंबईत भाजप-शिंदे युती आणि पुण्यात महायुतीमधील हेवीवेट नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवले आहे, तर ठाकरे गटानेही चिवट झुंज दिली आहे. मुंबईतील आरक्षण सोडती नंतर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेंडेकर यांनी विरोध केला आहे.

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण?

१.  बृहन्मुंबई : सर्वसाधारण महिला

२.  ठाणे : अनुसूचित जाती खुला

३.  कल्याण  डोंबिवली : अनुसूचित जमाती खुला

४,  नवी मुंबई: सर्वसाधारण महिला

५.  वसई-विरार : सर्वसाधारण खुला

६.  मिरा-भाईंदर : सर्वसाधारण महिला

७. उल्हासनगर : ओबीसी खुला

८.  भिवंडी-निजामपूर: सर्वसाधारण खुला

९.  पनवेल : ओबीसी खुला

१०.  पुणे: सर्वसाधारण महिला

११. सांगली-मिरज-कुपवाड : सर्वसाधारण खुला

१२. कोल्हापूर : ओबीसी खुला

१३. पिंपरी-चिंचवड : सर्वसाधारण खुला

१४. सोलापूर: सर्वसाधारण खुला

१५. नागपूर: सर्वसाधारण महिला

१६. अकोला : ओबीसी महिला

१७. अमरावती : सर्वसाधारण खुला

१८. चंद्रपूर: ओबीसी महिला

१९. नाशिक : सर्वसाधारण महिला

२०. मालेगाव : सर्वसाधारण महिला

२१. धुळे : सर्वसाधारण महिला

२२. जळगाव: ओबीसी महिला

२३. अहिल्यानगर : ओबीसी महिला

२४. छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण खुला

२५. लातूर : अनुसूचित जाती महिला

२६. नांदेड-वाघाळा : सर्वसाधारण महिला

२७. परभणी : सर्वसाधारण खुला

२८. इचलकरंजी : ओबीसी खुला

२९. जालना : अनुसूचित जाती महिला

मुंबईतल्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी अखेर आरक्षण सोडत जाहीर झालं आहे. मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र मुंबईतल्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्याने आक्षेप घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली, मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला, त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी काहीकाळ गोंधळ पाहायला मिळाला.