मोदी सरकारमध्ये फेरबदल !! दोन केंद्रीय मंत्र्यांना मंंत्रिमंडळातून डच्चू?

Foto
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये लवकरच उलटफेर होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात बदल, विस्तार होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळातून दोन मंत्र्यांना नारळ मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आगामी १८ जून रोजी होणार्‍या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारांच्या घोषणेनंतर आता दोन मंत्र्यांना निरोप दिला जाणार असल्याच्या शक्यतेववर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारमधील एकमेव ख्रिश्चन मंत्री असलेले जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू हे अनुक्रमे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून राज्यसभेवर गेले होते. त्यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबाने त्यांना त्यांच्या राज्यातून पुन्हा संधी दिलेली नाही. पक्षाने कोणत्याही निवृत्त होणार्‍या राज्यसभा खासदाराला पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. दरम्यान, ओडिशामधील पोटनिवडणुकीसाठी नुकतेच बिजू जनता दलातून भाजपमध्ये आलेले देबाशिष सामंतराय यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. मात्र, या यादीत केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना स्थान मिळालेले नाही. या धक्कादायक घडामोडीमुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग
या दोन मंत्र्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अधिक गतिमान झाली आहे. त्यातच आणखी दोन राज्यमंत्री पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांच्याकडे भाजपने आधीच संघटनात्मक जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी, तर हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली भाजप प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदलात भाजप काय मोठे निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.