दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या बंदला प्रतिसाद

Foto
छत्रपती संभाजीनगर , ( सांजवार्ता ब्युरो ) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण माफियाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये विविध सामाजिक संघटनांनी, विद्यार्थी संघटनांनी, व्यापारी, कामगार, वाहनचालक आणि विविध व्यावसायिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

लाठीमार हा लोकशाहीवरील थेट हल्ला असल्याची तीव्र टीका करण्यात आली.
देशभरात शिक्षण माफियाने शिक्षण व्यवस्था विळख्यात घेतली असून पेपरफुटी, वाढते शिक्षण शुल्क आणि कोचिंग उद्योगाच्या वाढत्या वर्चस्वामुळे सामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या संपूर्ण व्यवस्थेविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बंददरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, व्यापारी आस्थापना, दुकाने आणि विविध वाहतूक सेवा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण काही शाळा सुरू होत्या. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते शहरात संबंधित संस्था, व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांना भेटून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.

वंचित बहुजन आघाडीने सर्व नागरिकांना शांतता, संयम आणि संविधानिक मार्गाचा अवलंब करत २३ जुलैचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बंद यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अमित भुईगल, नगरसेवक जावेद कुरेशी , जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड,शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, शहराध्यक्ष मतीन पटेल,जिल्हा संघटक राजन किर्तने,   पंकज बोर्डे, विलास भिसे, सिद्धार्थ सदाशिवे, जिल्हा महासचिव सुरज मूळे पाटील, प्रविण हिवाळे,युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव,जिल्हा सचिव उमेश सरदार, भगवान खिल्लारे, आनंद शेजुळ, इक्बाल शेख, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम पटेल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते