छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): डाक विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शन सीएसएनपेक्स-2026 हे दि. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी कैलास शिल्प (हडको), सांस्कृतिक सभागृह, टी.बी. सेंटर येथे उत्साहात आणि विक्रमी प्रतिसादात पार पडले.
इतिहास उलगडणारी जुनी-दुर्मिळ टपाल तिकिटे पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी पोस्टल सर्व्हिसेस संचालक डॉ. अजिंक्य काळे, प्रवर अधिक्षक जी. हरिप्रसाद, सीनियर पोस्टमास्तर सुरेश एल. बन्सोडे, उपडाकपाल मासूम पटेल, निरीक्षक निवृत्ती तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात 1854 पासून आजपर्यंतची देश-विदेशातील अत्यंत दुर्मिळ, ऐतिहासिक व संग्रहणीय टपाल तिकिटे मांडण्यात आली होती. भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढा, थोर व्यक्तिमत्त्वे, कला-शिल्प, जैवविविधता, विज्ञान व सामाजिक विषयांवरील तिकिटांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सुधीर कोर्टीकर व त्यांचे पुत्र स्वप्निल कोर्टीकर यांच्या संग्रहासह तब्बल 120 हून अधिक संग्राहकांनी आपले संग्रह सादर केले. निबंध स्पर्धेत 250 तर क्विझ स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. निबंध, क्विझ व स्टॅम्प डिझाइन स्पर्धांतील अनुक्रमे 3, 3 व 4 विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. माय स्टॅम्प स्टॉल हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले. नागरिकांनी स्वतःचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेण्याचा अनोखा अनुभव घेतला.
यावेळी सुधीर कोर्टीकर यांचा गौरव करण्यात आला. कोर्टीकर यांनी शाळा-महाविद्यालये, महाएक्स्पो व अखिल भारतीय साहित्य संमेलनांतून आजवर 4 लाखांहून अधिक नागरिकांना ही प्रदर्शने विनामूल्य दाखविली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, जयंत नारळीकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, गोविंदभाई श्र्ॉफ, पत्रकार बाबा दळवी यांच्यासह 300 हून अधिक मान्यवरांनी त्यांच्या वहीत कौतुकपर अभिप्राय नोंदविले आहेत. कार्यक्रमास पोस्ट फोरम समितीचे अध्यक्ष सुरेश बन्सोडे, डॉ. अजिंक्य काळे, जी. हरिप्रसाद यांच्यासह समितीचे सदस्य अब्दुल कय्यूम, डॉ. शकील शेख, साजिद पटेल, सुभाष देवकर, युसूफ खान, तसेच सहदेव सातपुते, अनिल शेळके, विनय चामणीकर, सुनील कोळी, संजय पाटील, प्रकाश अहिरे व पोस्ट विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात प्रथमच एवढ्या व्यापक स्तरावर भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाने छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक-शैक्षणिक उपक्रमांत एक नवा, ऐतिहासिक अध्याय जोडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.












