तालुक्यातील मेडिकल १०० टक्के बंद
गंगापूर, (प्रतिनिधी): देशभरातील केमिस्ट व औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला गंगापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गंगापूर मेडिकल संघाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील बहुतांश औषध दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून १०० टक्के बंद पाळण्यात आल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.
औषध व्यवसायाशी संबंधित विविध समस्या, नियमांमधील वारंवार होणारे बदल, ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेले आव्हान, व्यापाऱ्यांवरील वाढता प्रशासकीय ताण तसेच औषध विक्रेत्यांच्या हिताशी संबंधित अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. शासनाने या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी औषध विक्रेत्यांनी केली.
गंगापूर तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवत एकजूट दाखवून दिली. तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभचथर बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी काळातही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या बंदमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी औषध विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत समाजातूनही सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे.















