छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेची तीच इमारत, त्याच पायर्या आहेत. फर्निचरमध्ये थोडाफार बदल आहे. ही जागा म्हणजे मुडदे गाडणारी आहे, इथे बेचैन आत्मे असतात, याचमुळे महानगरपालिकेला ग्रहण लागले आहे. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत पंचवटी चौकात चांगल्या जागेवर बांधा, असा सल्ला बुधवारी (दि.१५) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला.
महानगरपालिकेने जिल्हा नियोजन समितीमधून १५ कोटी ७८ लाख रुपये खर्च करून जर्मन तंत्रज्ञानावर आधारित १२ व्या मजल्यापर्यंत इमारतीला आग आटोक्यात आणणारे वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनाचे लोकार्पण बुधवारी सकाळी महापालिका मुख्यालयात पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची उपस्थिती होती.











