छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त एचओडीने तरुणांसोबत मैत्री केली. त्या तरुणांनी रिअॅलिटी शोच्या रंगवलेल्या स्वप्नात एचओडीने ५० लाख रुपये अडकवले. या व्यवहारातून वाद झाले आणि त्या तरुणांनी फार्म हाउसवर झालेल्या पार्टीत सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा करत तिघांना अटक केली आहे. राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. (वय २४), आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. गेवराई तांडा) व करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा) अशी आरोपींची नावे आहेत. ही माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी रविवारी (दि.१५) पत्रकार परिषदेत दिली.
ज्योतीनगर येथील रहिवासी अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त एचओडी राजाभाऊ सुभराव लोंढे यांची इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करणार्या विशाल राठोड याच्याशी मैत्री झाली. विशाल याने आकाश पवार व करण आडे यांची ओळख करून दिली. यांच्यात पार्ट्या होत असत. यातच तिघांनी खतरों के खिलाडीसारखा लव्ह अॅण्ड डेअर नावाचा रिअॅलिटी शो सुरू करण्याचे स्वप्न रंगवले. या प्रोजेक्टसाठी ५० लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी राजाभाऊ लोंढेना सांगितले. राजाभाऊ यांनी विशालला या रिअॅलिटी शोसाठी ५० लाख रुपये दिले.
खुनानंतर आरोपींनी मोबाइलवर स्टेटस
खून केल्यानंतर आरोपींनी ८ फेब्रुवारीला लोंढे यांचा मोबाइल पुण्यातील लक्ष्मी रोडवर नेला. तेथे मोबाइल सुरू करून तोडक्या मोडक्या इंग्रजीत स्टेटस ठेवले. या तोडक्या मोडक्या इंग्रजीवरून पोलिसांना संशय आला आणि आरोपींचा शोध लागला.














