बिडकीन (प्रतिनिधी) गाढेगाव शिवारात ऊस पिकात सापडलेले आणि त्यानंतर काही तासांत गायब झालेले बिबट्या मादीचे तीन बछडे मंगळवारी (दि. २४) रात्री उशिरा आईला सुरक्षितरीत्या मिळाले. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीच्या थर्मल ड्रोनच्या मदतीने वन विभाग व रेस्क्यू पथकाने नैसर्गिक पद्धतीने आई-बछड्यांचे पुनर्मिलन घडवून आणले.
गाढेगाव शिवारात अक्षय भवर यांच्या ऊस तोडणीच्या फडात कामगारांना तीन लहान बछडे आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्यांना सुरक्षितपणे एका ट्रेमध्ये ठेवले होते. मात्र काही तासांतच बछडे गायब झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थिती शांततेत व सुरक्षितरीत्या हाताळण्यासाठी मॅनविथ इंडिजच्या रेस्क्यू टीमने रात्री काळजीपूर्वक नियोजन केले. दाट उसात स्मार्ट सिटीच्या थर्मल ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. रात्री १०.२४ ला मादी बिबट पिलांकडे येत असल्याची हालचाल ड्रोनमध्ये स्पष्टपणे दिसून आली. कोणताही मानवी हस्तक्षेप टाळण्यात आल्याने तिने एकामागून एक आपल्या तीनही बछड्यांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी हलवले. याबाबत मॅन विथ इंडीज संस्थेचे आशिष जोशी यांनी समाधान व्यक्त केले.












