पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, रोजगार सेवकांची आढावा बैठक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): पंचायत समिती येथे सभापती अनीता सुरेश बनकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, रोजगारसेवक यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत रोजगार हमी योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे, शेततळे, वृक्ष लागवड या योजनेचे अपूर्ण राहिलेले लाभार्थी, शासनाकडे देय रक्कम थकीत असलेले लाभार्थी या योजनांचा आढावा घेण्यात आला. व त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व ग्रामसेवक रोजगार सेवकांना दिले.

तसेच येत्या काळात सिल्लोड तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भासू नये म्हणून गाव स्तरावर आढावा घेऊन पंचायत समिती ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजनांचा तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सभापती अनीता सुरेश बनकर यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच घरकुल अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. वैयक्तिक सिंचन विहिरीचे काळजीपूर्वक ऑनलाईन करून कुठलीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश यावेळी देण्यात आले.

सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी उपसभापती भगवान आहेर, गटविकास अधिकारी रत्नाकर पगारे, मंडळाध्यक्ष एकनाथ हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खरात, अंकुश कोठाळे, किशोर गवळे, विनोद चव्हाण, दिपक सपकाळ, विजय वानखेडे, भाऊसाहेब उबाळे आदींसह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, रोजगार सेवक आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.