रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

Foto
मुंबई : मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडूनसंजय शंकर घाडी यांची निवड करण्यात आली आहे. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी हे उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, महापौरपदासाठी घोषणा करण्यात आल्यानंतर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानते.
 
कोण आहेत रितू तावडे?

रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 
२०१२ मध्ये प्रभाग क्रमांक १२७ मधून विजय मिळवला होता.
२०१७ मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक १२१ मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. 
यानंतर २०२५ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३२ मधून विजय मिळवला आहे.
त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. 
त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा 

दुसरीकडे, मुंबई मनपामध्ये शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे. शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबईत सुद्धा पदांची खांडोळी पायंडा कायम ठेवला आहे. संजय घाडी यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली.
 
कोण आहेत संजय घाडी?

संजय घाडी १९८८-८९ पासुन शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सन १९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. सन २०१७ ते २०२२ शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे.