मित्राच्या भेटीसाठी निघाला होता १०वीतील ओम, पण पोहोचलाच नाही

Foto

वैजापूर – दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्राकडे निघालेल्या ओमवर रस्त्यातच काळाने घाला घातला. मुलगा अजून घरी कसा आला नाही, याचा शोध घेणाऱ्या आई-वडीलांना जेव्हा कळाले की ठोंबरे पेट्रोल पंपासमोर ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे, तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना मंगळवारी सकाळी शहरातील लक्ष्मी टॉकीजजवळ ठोंबरे पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. 

 

येथील इंगळे गल्लीत राहाणारा ओम प्रमोद पंचमेढे मंगळवारी सकाळी स्कुटीवरुन मित्राच्या घरी निघाला होता. मित्राला प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तो जात होता.  ठोंबरे पेट्रोल पंपासमोर त्याच्या स्कुटीला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली आणि ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला. पेट्रोल पंपावरील नागरिकांनी तत्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून  त्याला मृत घोषित केले.


मृत ओम पंचमेढे सेंट मोनिका हायस्कूलमध्ये १०वीच्या वर्गात शिकत होता. ओमच्या अपघाती निधनाने ऐन दिवाळीत पंचमेढे परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे.

वैजापूर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे.