पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नियोजनाची मागणी, निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गंगापूर, (प्रतिनिधी) खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील सिंचन आणि उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता सतावू लागल्याने गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी गंगापूर तालुक्यातील तीन प्रमुख ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय रांजणगाव फाटा येथेही आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनांमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ विस्कळीत झाली होती. वैजापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पंडितअण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. २७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चानंतरही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अखेर पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे हत्यार उपसले.
तीन ठिकाणी एकाच दिवशी आंदोलन शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाचा उद्रेक शुक्रवारी तालुक्यातील विविध भागांत पाहायला मिळाला. सकाळी ११ वाजता सिरजगाव फाटा येथे संजरपूर, मालुंजा, उत्तरवाडी, भालगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर द्वारी १२. ३० वाजता मुद्देशवाडगाव फाटा येथे मांजरी, शिंगी, पिंपरी, वरखेड, मुद्देशवाडगाव व वाहेगाव परिसरातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी वाहतूक रोखून धरली.
दुपारी २ वाजता भेंडाळा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर बोलेगाव, बाबरगाव, सव्यदपूर, बाळापूर व भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच रांजणगाव फाटा येथेही आंदोलन करण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
-- तीन आवर्तने आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाची मागणी --
रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्यासाठी कालव्याची तीन आवर्तने तातडीने सोडावीत, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याची आवर्तने आरक्षित ठेवावीत, तसेच कालव्याच्या पाण्याचे वितरण टेल टू हेड पद्धतीने म्हणजेच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळेल, अशा पद्धतीने करावे, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या वैजयंती वाल्मीक सिरसाठ, नारायण बाराहाते, अजयसिंग परदेशी, माणकचंद राजपूत, योगेश दंडे, दिनेश तोडमल यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने तातडीने आदेश द्यावेत; अन्यथा यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी कड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जलसंपदामंत्र्यांकडे चार आवर्तनांची मागणी : आमदार बोरनारे
दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर उपोषणस्थळी आमदार बोरनारे, बाबासाहेब जगताप आणि राजेंद्र साळुंके यांनी भेट दिली होती. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सिंचनासाठी दोन आणि पिण्याच्या पाण्यासाठी दोन, अशी एकूण चार आवर्तने सोडण्याची मागणी केल्याचे आमदार बोरनारे यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे नाशिक येथे नियोजित बैठक रद्द झाली.
दोन दिवसांत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी ऑनलाइन बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. आता नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या पाण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कधी न्याय मिळतो, याकडे गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.















