२५ वर्षांपासून रखडलेला रस्ता मोकळा

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील मालुंजा (खुद्द) येथील शिरजगाव फाटा परिसरातील तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपाने निकाली निघाला आहे. तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या आदेशानुसार गट क्रमांक ३०, २२ आणि ७४ ते ७५ मधील सुनिता भानुदास खाजेकर यांच्या शेतामध्ये जाण्यासाठीचा रस्ता मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोकळा करून दिला.

सदर रस्ता वयवाटीत नसल्यामुळे अनेक वर्षांपासून वाद निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार नवनाथ वगवाड व मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी शेख तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पुढाकार घेत कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी शेख तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई शांततेत पार पडली. 

प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसरातील वाहतूक व शेतात जाण्याचा मार्ग आता सुरळीत झाला आहे. यावेळी शुभांगी शिंदे मंडळ अधिकारी गंगापूर, ग्राम महसूल अधिकारी मौजे मालुन्जा खुर्द राशीद शेख, पोलीस कर्मचारी विजय पाखरे, ए. आर. शिंदे, होमगार्ड छाया पंडित यांनी परिश्रम घेतले.

 गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला शेतात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करून दिल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

- सुनिता खाजेकर, शेतकरी

 तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने नियमानुसार कारवाई केली. संबंधित सर्व पक्षांच्या उपस्थितीत शांततेत रस्ता मोकळा करण्यात आला.
- शुभांगी शिंदे, मंडळ अधिकारी, गंगापूर

२५ वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर निकाली निघाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
- भानुदास खाजेकर, स्थानिक नागरिक