गंगापूर, (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ गंगापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मराठा आरक्षणाच्या मागणीला जोरदार समर्थन दिले. मराठा आरक्षणासाठी ही शेवटची संधी असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे आंदोलकांनी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात देविदास पाटील, नगराध्यक्ष संजय विठ्ठल जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, साखर कारखाने चेअरमन कृष्ण पाटील डोणगावकर, डॉ. उद्धव काळे, अविनाश पाटील, वैजापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळे, विश्वजीत चव्हाण, वाल्मीक शिरसाट, स्वीकृत नगरसेवक सुवर्णा जाधव, संगीता वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव व समन्वयक उपस्थित होते.
मराठा दरम्यान, आरक्षणाच्या मागणीचे निवेदन मंडळ अधिकारी श्रीमती शिंदे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाल्याने शिवाजी महाराज चौक परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.















