फुलंब्री, (प्रतिनिधी) : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी बायपास रस्त्यावरील पुलाजवळ एका नागरिकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून मोबाइल व रोख रक्कम लुटल्याच्या घटनेतील तीन आरोपींना फुलंब्री पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून अटक केली आहे. ही घटना बुधवारी (१८ नोव्हेंबर) रोजी रात्री ११.४५ वाजता घडली होती. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी ७.१० वाजता खुशालसिंग नानकसिंग गिल (वय २३, रा. कोलठाणवाडी), सागर ऊर्फ मारी इंदलसिंग जारवाल (वय २२, रा. कृष्णापूरवाडी) आणि घनश्याम सुपडसिंग घुसिंगे (वय २६, रा. कृष्णापूरवाडी) या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक स्कुटी, फिर्यादीकडून लुटलेले दोन मोबाइल फोन, एक रिक्षा, फिर्यादीला धाक दाखवण्यासाठी वापरलेले धारदार चाकू किंवा शस्त्र आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक; तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक दवंगे, पोलिस हवालदार राठोड, पोलिस हवालदार नागलोत आणि पोलिस अंमलदार गायकवाड यांनी पार पाडली.