नक्षत्रवाडीत सशस्त्र दरोडा, १० वर्षांच्या नातवाच्या गळ्यावर गुप्ती लावून वृद्ध दाम्पत्याला लुटले

Foto

औरंगाबाद – शहरातील नक्षत्रवाडी भागात आज (ता. ५) पहाटे सात सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. साखर झोपेत असलेलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून त्यांना मारहाण करत त्यांच्या १० वर्षांच्या नातवाच्या गळ्यावर धारदार गुप्ती लावून दरोडेखोरांनी रोख रक्कम,  सोन्याचे दागिन्यांसह ५५ हजाराचा ऐवज लुटला. दुपारपर्यंत या घटनेचा सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

दोन वर्षानंतर शहरात सशस्त्र दरोडा

औरंगाबाद शहरात दोन वर्षानंतर सशस्त्र दरोडा पडला आहे. नक्षत्रवाडी येथील भूजल सर्वेक्षण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी शांतीलाल पागोरे (६८) त्यांची पत्नी अनुसयाबाई पागोरे (५८) आणि त्यांचा १० वर्षांचा नातू समोरच्या हॉलमध्ये झोपलेले होते. शांतीलाल पागोरे यांची मुले त्यांच्या खोलीत झोपलेली असताना पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले.  काही कळण्याच्या आत दरोडेखोरांपैकी एकाने लहानग्याच्या गळ्यावर धारदार गुप्ती लावली व इतर दोघांनी पागोरे व त्यांच्या पत्नीचे तोंड दाबून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील कपाट व इतर ठिकाणी काय ठेवले आहे याची झाडाझडती घेतली. आरडाओरड केल्यास नातवाला ठार मारू अशी धमकी दरोडेखोरांनी दिली होती. त्यामुळे घाबरून अनुसयाबाई शांत होत्या, मात्र दरोडेखोर नातवाला काही करतील म्हणून पागोरे यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांचे दगडी गोट्याने तोंड दाबून बेदम मारहाण केली. नातवाला मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी पागोरे यांच्या घरातील ४८ हजार रुपये किंमतीचे सोने, सात हजार रोख असे सुमार ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

 

या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांसह गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक जारवाल, सहायक उप निरीक्षक भंडारी, राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. फिंगरप्रिंट एक्स्पर्टसह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र  श्वान जागेवरच घुटमळला. या प्रकरणी दुपारपर्यंत  सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

 

कालच आणली होती पेन्शन

शांतीलाल पागोरे हे भूजल सर्वेक्षण विभागात चालक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना दरमहा ९ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. सोमवारीच त्यांना निवृत्ती वेतन मिळाले होते. त्यावर दरोडेखोरांनी २४ तासांत डल्ला मारला.

 

सातारा पोलिसांकडून दरोडेखोर निसटले

पागोरे यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर एकूण सात दरोडेखोर हे दोन मोटारसायकल वरून निघाले मात्र काही अंतरावरच जात असताना गस्तीवर असलेल्या सातारा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत  सातही दरोडेखोर विजयनगर भागातून पसार झाले. हाच  कच्चा रस्ता पुढे वाळूजकडे जात असल्याने दरोडेखोर हे वाळूज भागातील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.