पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नांदेडच्या मानाच्या वारकरी दाम्पत्यासह दोन विद्यार्थ्यांनाही महापूजेचा मान देण्यात आला. यावेळी पंढरपूरची चंद्रभागा प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नगर विकास खात्याकडून 120 कोटी रुपये निधी दिला असून यातील पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरवर्षी कार्तिकी एकादशीला परंपरेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी महापूजा करतात. यंदा देखील दर्शन रांगेतून माळकरी वारकरी जोडप्याची महापूजेसाठी निवड झाली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील पोटा गावचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सुशीलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. वालेगावकर हे गेल्या 20 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत.
यंदा कार्तिकी एकादशीला दोन विद्यार्थ्यांना देखील महापूजेचा मान देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी महापूजेत सहभागी झाला. यामध्ये पापरी येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी मानसी आनंद माळी आणि देवडी येथील शाळेचा विद्यार्थी आर्या समाधान थोरात यांना हा मान मिळाला.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी मंत्री भरत गोगावले, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
आज कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून 5 लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी महासागर चंद्रभागेच्या तीरावर पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.