साजवार्ता
Date: 16/11/2026
८ दिवसांत मनपा तिजोरीत सव्वाकोटी जमा
विलंब शुल्क १०० टक्के माफीचा धमाका : सातारा-देवळाईतून सर्वाधिक प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सवलतीच्या योजनेतून अवघ्या आठ दिवसांत मनपाच्या तिजोरीत १ कोटी २८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे, गुंठेवारीनंतर आता थकीत कर भरण्यातही सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी आघाडी घेतली
उपनी संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
असून, या भागातून तब्बल २६ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी थकबाकीदारांना दिलासा
देण्यासाठी ही योजना जाहीर केली होती. आगामी ३१ डिसेंबरपर्यंत नागरिकांना या शतशः विलंब शुल्क माफीचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी गुंठेवारी योजनेतून ३१ ऑक्टोबरपर्यंत मनपाला १४७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ही योजना संपताच मालमत्ता करात सवलत दिल्याने करदात्यांमध्ये उत्साह आहे. ऑनलाइन पेमेंट सुविधेमुळे नागरिक घरबसल्या कर भरण्याला प्राधान्य देत असल्याची माहिती मनपा उपायुक्त विकास नवाले यांनी दिली.
अशी आहे थकबाकीची स्थिती
महानगरपालिकेच्या दप्तरी एकूण ३ लाख ३४ हजार मालमत्ताधारकांची नोंद आहे. मात्र, यातील केवळ १ लाख ४५ हजार नागरिकच दरवर्षी नियमित कर भरतात. उर्वरित थकीत रकमेवर मनपाकडून दरवर्षी २४ टक्के चक्रवाढ व्याजाने विलंब शुल्क आकारले जाते. अनेक वर्षे कर न भरल्यास ही दंडाची रक्कम मूळ करापेक्षाही दुप्पट तिप्पट होते, त्यामुळे नागरिक कर भरण्याचे टाळतात. यातील बहुतांश मालमत्ता राहत्या घरांच्या असल्याने मनपा सहसा जप्तीची कारवाई करत नाही; मात्र व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या जातात. आता दंडाची रक्कम पूर्णपणे माफ झाल्याने थकबाकीदारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असून, ३१ डिसेंबरपूर्वी कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














