व्हिडिओ चित्रीकरणावरून धक्काबुक्की
वैजापूर, (प्रतिनिधी) : रस्त्याच्या : प्रकरणावरील सुनावणीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी तुफान वाद झाला. व्हिडिओ चित्रीकरण करण्यावरून वाद उफाळून आला असून दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार कार्यालयात सुनावणीसाठी ते सकाळपासून उपस्थित होते. दुपारी ४ वाजेपर्यंत तहसीलदार न आल्याने त्यांनी दालनातील परिस्थितीचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. एका कर्मचाऱ्याने अचानक येऊन मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला तसेच गच्ची पकडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
: संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी दालनात व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याने मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आणि त्यातून हा प्रकार घडला. या घटनेबाबत नायब तहसीलदार कुमावत यांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याला समज देण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या प्रकरणात शेतकऱ्यांचे लेखी म्हणणे नोंदवून घेण्यात आले असून स्थळ पाहणीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.













