औरंगाबाद: नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यातच उरकून घेणे गरजेचे असताना, पावसाळा सुरू झाल्यानंतरही नालेसफाईचे घोडे अजूनही अडलेले आहे. एकीकडे सलग दोन दिवसापासून तासभर होत असलेल्या पावसाने नाले वाहण्यास सुरुवात झालेली असताना दुसरीकडे प्रशासन मात्र निविदा काढण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नालेसफाई न झाल्याने पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन धोका संभावण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे याबाबत प्रशासन मात्र अद्यापही गाफीलच असल्याचे दिसते.
प्रत्येक कामात दिरंगाई ही जणू मनपा प्रशासनाची सवयच झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, या कामातही प्रशासनाने दिरंगाई केल्याचे पाहायला मिळते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस तासभर झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहरातील नाले खळ-खळ वाहू लागले आहेत. शहरात एकूण ९८ नाले आहेत. वर्षभरापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी झाल्याने बहुतांश नाल्यांमध्ये मोठा प्रमाणावर कचरा टाकण्यात आल्याचे निदर्शनाला येते. परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी असल्याने या समस्येने डोके वर काढले नाही. आज घडीला देखील किल्लेअर्क, भवानीनगर, जुना मोंढा परिसर, जाफर गेट आदी भागात मोठ्या प्रमाणावर नाल्यांमध्ये कचरा पडलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाची नालेसफाई आणखी लवकर उरकून घेणे अपेक्षित होते. याकामी पावसाळा तोंडावर असतांना मे अखेरीस प्रशासनाने १ कोटी ६८ लाख रुपयांची निविदा काढली. यात यंत्रसामग्री किरायाने घेण्यात येणार आहे. २७ मे ला ही निविदा उघडण्यात आली. परंतु अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया करावी लागली. पावसाचा जोर वाढल्यास नाले तुडुंब भरून वाहून नाल्याकाठच्या वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका असतानाही प्रशासन अजूनही निविदा काढण्यात दंग असल्याचे चित्र दिसते. आता नालेसफाईचे काम सुरु केले तरी पाऊस पडत असताना नाल्यांची सफाई होणार कशी? असा सवाल नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाची होणार कोंडी
नाल्यातून काढण्यात आलेला गाळ टाकण्याकरिता प्रशासनाकडे जागाच उपलब्ध नसल्याचे समजते. एकीकडे सुरू झालेला पावसाळा, त्यात होणारी नालेसफाई, नाल्यातून काढलेला गाळ, कचरा टाकण्याकरिता नसलेली जागा यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
पूर्वीच्या घटनातून प्रशासनाने घेतला नाही धडा
यापूर्वीही पावसाळ्यादरम्यान जय भवानी नगर परिसर येथे कामगाराचा तर एन-6 भागात उघड्या गटारीत पडून एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलेला होता. पूर्वी घडलेल्या या घटनेतून प्रशासनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे दिसून येते.
















