खुलताबाद, (प्रतिनिधी): सत्ताधारी पक्षाने राज्यामध्ये जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार विकत घेतले. आता त्यांची नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना खरेदी करण्याची तयारी चालली आहे. त्यांच्या या आमिषाला बळी पडू नका. शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या मतदारांना विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये केले.
जुने बसस्थानक परिसरात आयोजित केलेल्या सभेस खासदार कल्याण काळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख राजू वरकड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, नामदेव पवार, बाजार समितीचे माजी सभापती अनिल श्रीखंडे, काँग्रेस शहराध्यक्ष माजीद मनियार, आमेर पटेल, माजी अध्यक्ष समद टेलर, सत्यनारायण दादे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले की, राज्यातील सत्ताधाऱ्यांना केवळ आर्थिक निकषावरील बाबी महत्त्वाच्या वाटत आहेत. सत्तेतील कोणी म्हणतो की, राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या हातात आहे, कोणी म्हणतो माझ्याकडे डुप्लिकेट चावी आहे तर कोणी म्हणतो तिजोरी ठेवलेला माल आमचा आहे. या मंडळींना जनतेचे कोणतेही देणे-घेणे नाही, या मंडळींनी जनतेला गृहीत धरले आहे.
आम्ही आमदार, खासदार विकत घेऊ शकतो, तर मतदारांची काय बात? अशा वल्गना ते करत आहेत. त्यामुळे अशा मंडळींना धडा शिकवण्याची ही वेळ आली असून. मतदारांनी आपला स्वाभिमान कायम ठेवावा. मत विकू नका, लोकशाही वाचवा. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार कल्याण काळे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू वरकड, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, नामदेव पवार, बाजार समितीचे माजी सभापती अनिल श्रीखंडे, काँग्रेस शहराध्यक्ष मजीद मनियार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुगंधा ढवळे, संदीप तंबारे, सईदा बेगम, नंदू काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्यनारायण दादे यांनी केले.










