डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एस.टी. महामंडळाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्यातील लालपरी आता एलएनजीवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणाचा र्हास टळणार असून, महामंडळाला 1 हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
पंढरपूर येथे उभारण्यात येणार्या भक्त निवास व नवीन स्थानकाच्या भूमिपूजनानंतर पत्रकारांशी बोलताना रावते म्हणाले, यामुळे डिझेलवर खर्च होणार 1 हजार कोटींचा खर्च वाचणार असून अशा पद्धतीने ‘एलएनजी’वर बस चालवणारा महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असणार आहे. यासाठी राज्यातील 18 हजार बसेसमध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. एस.टी. महामंडळ यासाठी आपले पंप बाहेर बसवणार असून, यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत एलएनजी (द्रव रूपातील पेट्रोलियम गॅस) टाकता येईल. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणार्या बसेसमधून मिळणार्या उत्पन्नातून महामंडळ कर्मचार्याचा पगार भागू शकतो एवढी महत्वाची शिवरात्री यात्रा असल्याने यासाठी वेगळे नियोजन केले जात असल्याचे रावते यांनी सांगितले. एस.टी. कर्मचार्यांच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजना सुरू केली असून, या मुलांच्या परदेशी उच्च शिक्षणाचा खर्चदेखील महामंडळ उचलणार आहे. महामंडळ कर्मचार्याच्या मुलींसाठी 1 लाखाची ठेव योजनेतून आतापर्यंत एक हजार कर्मचार्यांना लाभ झाल्याचेही रावते म्हणाले.विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी ज्या पद्धतीने प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा विषय आणला तो चुकीचा होता, असा गंभीर आरोप केला. आपण जे वागलो ते योग्यच होते असे सांगत सभापती सर्वोच्च पद असल्याने आपण माफी मागितल्याचे रावते यांनी सांगितले. रायगड येथील बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर सार्वजनिक परिवहन सेवेत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून, यापुढे असे करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. महामंडळातील भ्रष्ट टेंडर प्रक्रिया मोडून काढण्यासाठी राज्यातील सर्व बस स्टॅण्डमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून शेतीला लागणारी बहुतांश कामे आता महामंडळातच केले जात असल्याचे रावते यांनी सांगितले.