मुंबई : मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. या विधानाच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. सोमय्या यांच्या दणक्यानंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सहर शेखचा माफीनामा. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणार्या हम मुंब्रा को हरा बना देंगे या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सहर शेख हिची पोलिसांनी चौकशी केली असता तिने माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये तिने मुंब्रा येथे झालेल्या सभेत हम मुंब्रा को हरा बना देंगे असं भाषण केलं होतं. पण तिने हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचं सांगितलं. कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते असं सहर शेखने आपल्या लेखी जबाबात लिहून दिलं आहे.
किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत औपचारिक तक्रार नोंदवली होती. सोमय्या यांनी पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष भाषणात कुठेही वृक्ष किंवा झाडे लावण्याचा उल्लेख नसल्याचा दावा केला. उलट, भाषणादरम्यान मुंब्रा येथील २० टक्के हिंदू बांधवांविरोधात धमकीची भाषा वापरण्यात आली असून, त्यांना संपवण्यासारखेफफ गंभीर वक्तव्य केल्याचा आरोप सोमय्या केला होता. तसेच या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असं सांगत सहर शेख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे केली होती.