मुंबई : साहिल वाकोडे विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर आयआयटी मुंबईने पहिला निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राध्यापक आणि अधिष्ठाता सूर्यनारायण दुल्ला यांना पदावरून निलंबित करण्यात आल आहे. आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयआयटी-मुंबईतील प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना तीन दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनानंतर अधिकृतपणे निलंबित करण्यात आले आहे. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणानंतर हे आंदोलन सुरू झाले होते.
साहिलवर गेल्या शुक्रवारी सेमिस्टर परीक्षेदरम्यान कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला होता. परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक असलेल्या प्रा. दुल्ला यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. आयआयटी-बॉम्बेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मयत विद्यार्थी साहिल वाकोडे याचे समुपदेशन करण्यात आले होते आणि कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता त्याला सोडण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या संचालक केदारे यांनी केल्या मान्य
२० सप्टेंबरच्या सायंकाळी आंदोलक विद्यार्थ्यांनी १८ मागण्या सादर केल्या. या आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी स्वाक्षरी करत या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. १८ मागण्यांमध्ये एक मागणी दुल्ला यांचे निलंबन करण्यात यावे, अशीही होती.
परीक्षेत चॅटजीपीटीचा वापर, हॉस्टेलमध्ये आत्महत्या
ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक असलेले सूर्यनारायण दुल्ला हे त्या परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक होते. साहिल वाकोडे याने परीक्षेत उत्तरे शोधण्यासाठी मोबाईलच्या मदतीने चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेच्या काही तासांनंतरच वाकोडे याने आत्महत्या केली. मात्र आता या निवेदनाबद्दल आयआयटी प्रशासनाने माफी मागितली आहे.
आयआयटी मुंबईने नव्याने मागितली माफी
आयआयटी मुबंईने विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबाबत आपल्या पूर्वीच्या निवेदनाबद्दल माफी मागितली आहे. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या घडामोडींचा अजूनही अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असल्याचे आयआयटी संस्थेने म्हटले आहे. "साहिलच्या दुर्दैवी निधनानंतर याप्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आमच्या आधीच्या निवेदनात केलेल्या वक्तव्यांबद्दल आम्ही माफी मागतो," असे आयआयटी मुंबईने ट्विटमध्ये म्हटले आहे.
या घटनेमागील घटनाक्रम आणि परिस्थितीचा तपास योग्य अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर, योग्य तपास प्रक्रियेद्वारे अधिकृतपणे निष्कर्ष समोर येण्यापूर्वी आणि त्याच्या निधनापूर्वी घडलेल्या घटनांशी संबंधित माहिती मांडणे किंवा त्यांचे वर्णन करणे अयोग्य होते, असेही संस्थेने म्हटले आहे. त्याचबरोबर संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी राजीनामा दिलेला नाही, अशी माहितीही संस्थेने दिली आहे.