छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शेतकरी वारकरी आहेत तर वारकरी शेतकरी आहे. शेतकरी आणि वारकरी यांना वेगळे करताच येत नाही. ते दोघेही एकमेकांच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे संत आणि शेतकरी एकरूपच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध लोककवी, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
शेतकरी नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्यप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बळीराम किनाळकर होते. व्यासपीठावर रणजित ढेपे, शिवाजी पा. हिवाळे, दत्ता पवार, अॅड. रमेश वाकडे, अॅड. पंडित आनेराव यांची उपस्थिती होती. संतांच्या साहित्यात आपणाला
सर्वत्र शेतकरी पहायला मिळतो. शेतकरीही आपल्या मुखातून संताचे विचार गात राहतो. शेतकऱ्यांचा लोकनायक विठोबाही त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी उभा असतो, हे आपणास संतांच्या वाड्मयात अनुभवायला मिळते, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र नैसर्गीक संपत्तीने सधन असतानाही शेतकरी आत्महत्याचे प्रमाण मोठे आहे. ते दूर करण्यासाठी शासन स्तरावर नियोजन महत्त्वाचे आहे. हे सांगतानाच माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या कारकीर्दीचा चाळीस वर्षांचा अनुभव सत्काराला उत्तर देताना सांगितला. प्रास्ताविक डॉ. सत्यपाल कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन तम्मेवार यांनी केले तर आभार सतीश निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल फंड, नामदेव कांबळे, वैजनाथ वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













