पैठण, (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणावर आंब्यांची आवक सुरू झाली असतानाच केमिकलच्या सहाय्याने पिकवलेल्या आंब्यांच्या विक्रीत वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
कृत्रिमरीत्या पिकवले जाणारे हे आंबे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर केला जात आहे. या
रसायनांमुळे आंबे वरून आकर्षक व पिवळसर दिसत असले तरी आतून पूर्णपणे पिकलेले नसतात. अशा आंब्यांच्या सेवनामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, घशात जळजळ तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारी उदभऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा केमिकलयुक्त फळांचा अधिक धोका संभवतो. अनेक ग्राहक फळांचा रंग आणि आकार पाहून खरेदी करतात मात्र नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे आरोग्यास अपायकारक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने बाजारातील आंब्यांची तपासणी करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच ग्राहकांनी आंबे खरेदी करताना काळजी घ्यावी, अतिशय चमकदार व एकसारखा पिवळा रंग असलेले आंबे टाळावेत आणि फळे स्वच्छ धुवूनच सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना प्राधान्य देऊन नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.













