एका प्लॉटची दोघांना विक्री

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवर्ता ब्युरो) : एकच प्लॉटची दोघांना विक्री करून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार गंगापूर जहांगीर येथे घडला. या प्रकरणी दि. २२ जानेवारी रोजी दोघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल भागचंद शिंदे (४७, रा. शिवज्योत कॉलनी, एन-६ सिडको), सुधाकर विश्वनाथ ससाणे (४७, रा. गल्ली क्रं. १०, नवनाथ नगर), अशी आरोपींची नावे आहेत. शेखर रामसिंग गरंडवाल (३४, रा. नवनाथ नगर, गारखेडा) हे फिर्यादी आहेत. ते सत्यम स्पिरीट्स प्रा. लि. येथे रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. घर बांधण्यासाठी प्लॉटच्या शोधात असताना त्यांना गंगापूर जहांगीर येथील गट क्रमांक १०१ मधील प्लॉट क्रमांक २६ ज्याचे क्षेत्रफळ १३६३.८० चौ.मी. प्लॉट असल्याचे समजले. मूळ मालक भोजीराम लालू जाधव यांच्या नावावर सातबारा नोंद असलेला असून, हर्षल शिंदे यांच्याकडे त्याचा मुखत्यारनामा असल्याचे सांगण्यात आले. 
मध्यस्थ सुधाकर ससाणे याच्या माध्यमातून ५ लाखांत व्यवहार ठरला. २१ एप्रिल २०२५ रोजी बीड बायपास येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ येथे खरेदी व्यवहार करण्यात आला. त्यावेळी प्लॉट अकृषिक असून लेआऊट मंजूर असल्याचे दस्तऐवज दाखविण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात प्लॉट खरेदी-विक्रीतून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत.
२०२३ मध्येच विकला होता प्लॉट
शेखर गरंडवाल यांनी प्लॉट खरेदी केल्यावर महिन्याभराने सातबारावर फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला. हा प्रकार मूळ मालक भोजीराम जाधव यांनी फेरफारास आक्षेप नोंदविल्याने तलाठ्याने गरंडवाल यांचा फेर रद्द केला. तेव्हा मूळ मालकाने ३ जानेवारी २०२३ रोजी साक्षी महेश रत्नपारखी यांना प्लॉट विकल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून गरंडवाल यांना प्लॉट विकणारे हर्षल शिंदे आणि साक्षी रत्नपारखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत आहेत.