मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, ओबीसी समावेशासाठी लढा उभारावा लागेल - संभाजी ब्रिगेड

Foto

नांदेड - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून १६  टक्के आरक्षण दिले आहे. वास्तविक मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा अशी समाजाची मागणी होती, असे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील यांनी म्हटले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे सांगत संतोष गव्हाणे पाटील यांनी गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षणाला मृगजळ म्हटले आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यासाठी पुन्हा लढा उभारावा लागणार असल्याचेे ते म्हणालेे.

 

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाला म्हटले मृगजळ

गव्हाणे पाटील म्हणाले, मराठा समाजाची खरी मागणी होती की त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात यावा. या अगोदर आघाडी सरकारच्या काळात राणे समितीने ही मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतू ते न्यायालयात टिकले नाही. फडणसवीस सरकारने दिलेले आरक्षण हे संवैधानिक रित्या नेमलेल्या राज्य मागास आयोगाच्या शिफारशीनुसार दिले एवढीच बाब फक्त समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया संतोष गव्हाणे पाटील यांनी दिली. न्यायालयात या आरक्षणासाठी सरकारची कसोटी लागणार असल्याचे सांगत ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्के आरक्षणाची मर्यादा गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षणाने ओलांडली आहे. त्यामुळे १६ टक्के स्वतंत्र आरक्षण हे मृगजळच ठरू शकते.

 

केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आरक्षणाचा फायदा नाही 

राज्य सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोगाने मात्र मराठा समाजाला न्याय दिलेला आहे.  ४० हजार ९६२ कुटुंबाचा सर्वे करून मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागास असल्याचा निष्कर्ष आयोगाने नोंदविला आहे. याबद्दल गव्हाणे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. आयोगानी मांडलेल्या निष्कर्षानुसार मराठा समाजाचा इतर मागासवर्गामध्ये (ओबीसी) समावेश करण्यास सरकारला काहीही अडचण नव्हती.  पण फडणवीस सरकारने तसे न करता मराठा समाजावर अन्याय करून स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण दिले. या आरक्षणाचा केंद्रांमधील नोकरी अथवा शैक्षणिक क्षेत्रातील कुठल्या गोष्टी मध्ये काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे हे १६ टक्के आरक्षण म्हणजे  मराठा समाजाची फसवणूक केल्यासारखे आहे.  या निर्णयाचे स्वागत करणारे हे भाजपचेच लोक आहेत. मराठा समाजाने त्याचे स्वागत केले नसल्याचे गव्हाणे पाटील म्हणाले.

 

 ओबीसीत समावेशासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल

संतोष गव्हाणे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये अण्णासाहेब पाटील यांच्यापासून  आतापर्यंत बलिदान दिलेलल्यांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. जल्लोष करणारे या हुतात्म्यांचा अपमान करत आहेत.गव्हाणे पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत न करता ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.