उजनी जलाशय परिसरातील शेतातून केली अटक
वैजापूर, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगाव शिवारात उद्योजकाला मारहाण करून सोन्याची साखळी पळविल्या प्रकरणातील आणखी दोन सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी गुरूवारी सकाळी जेरबंद केल्याने या गुन्हयातील आरोपींची संख्या सात झाली आहे.
समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगाव शिवारात साहील सोनवणे रा टाकळीमिया ता राही यांची गाडी अडवून मारहाण करून चोरांनी लुटले होते. या चोरीतील आरोपी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण क्षेत्राच्या ऊसाच्या शेतात हे दोन आरोपी लपून बसले होते. पोलीसांनी वेषांतर करून शेतकर्यांच्या वेषात आरोपींना सकाळी पकडले. उमेश लक्ष्मण गायकवाड (३४ वर्षे रा. मालेवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) व ज्ञानेश्वर शहादेव जाधव (२७ वर्षे रा. पिठी
नायगाव ता. पाटोदा जि. बिड) असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत असून विविध जिल्ह्यांतील गुन्ह्यांमध्ये ते पोलीसांना हवे होते.
त्यामुळे ते नेहमी ठिकाण बदलत होते. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी आरोपींच्या नेहमीच्या शोधपद्धतीपेक्षा वेगळी रणनीती आखली. त्यानुसार स्था. गु. शाचे विशेष पथकातील पो. उप. नि. भरत निकाळजे, पो.अं. सचिन राठोड, सुनिल गोरे, संतोष डोंगरे अनिल काळे व शिवाजी मगर यांचे पथक सोलापूर जिल्ह्यात तीन दिवसापासुन आरोपीच्या मागावर होते.
इंदापूर जि. पुणे नजीकच्या टोलनाक्यावर दोन्ही आरोपी त्यांच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून जाताना पथकाच्या
निदर्शनास आले होते. उजनी धरणाच्या जलाशयाच्या दिशेने जाणार्या ऊस व द्राक्षाच्या शेतीतील पांदण रस्त्यांचा आधार घेत पोलिसांना ते गुंगारा देत होते. आरोपींची दुचाकी याच परीसरात दिसून पोलीसांना दिसून आली. परंतु पाऊस, विस्तीर्ण जलाशय, सर्वत्र ऊसाचे शेत, वन्य प्राण्यांची भिती यामुळे आरोपींना पकडणे आवाहन होते. परंतु पोलीसांनी शेतकऱ्यांच्या वेषात अखेर त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पुर्वी पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीची संख्या आता सात इतकी झाली आहे. तपास परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे हे करीत आहेत.















