मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटात रशीद मामूंचा प्रवेश पार पडला. तो वादग्रस्त ठरताना दिसत आहे. कारण चंद्रकांत खैरे यांनी त्याला विरोध केला. एवढंच नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगूलचालन केलं जातंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यावर संजय राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
जसे तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांचे, अशोक चव्हाणांचे, सर्व भ्रष्टाचार्यांचे जोडे चाटतायं तसं ? हे काय आहे ? रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीसुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचार्यांचे जोडे चाटताच आहात ना. ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजित पवार, अशोक चव्हाण यांचे जोडे कोण चाटतंय ? कशाकरता चाटत आहेत मग ? असा सवाल उपस्थित करत हे सगळे एकाच माळेतले मणि आहेत, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली असून राज व उद्धव ठाकरे तब्बल १८ वर्षांनी एकत्र आलेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी युतीची घोषणा केली असून मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा करिश्मा पहायला मिळणार आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या ६७ प्रभागांमध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पहायला मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी विजयाचा दाव करत मुंबई महापालिकेत किती जागा जिंकणार याचा थेट आकडाच सांगितला.
तुम्ही ६७ काय घेऊन बसलात, आम्ही याक्षणी ११५ जागा जिंकत आहोत. बहुमताला जो आकडा लागतो, याक्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत. ११७-१२० पर्यंत जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आणि आमच्या मतदारांनासुद्धा आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं. मुंबई महापालिकेत ठाकरेंचाच विजय होणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.