औरंगाबाद: घरातील सदस्य झोपलेले असताना साडी घालून आलेल्या तीन चोरट्यानी वरिष्ठ पत्रकार विनोद काकडे यांच्या घरी धाडसी चोरी करीत कपाटातील दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील गजानननगर भागात घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी मध्यरात्री काकडे परिवार घरातच झोपलेले होते. विनोद काकडे हे पहिल्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांची आई या खालच्या खोलीत झोपल्या होत्या .दरम्यान, मद्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यानी साडी घालून घरात प्रवेश केलाव खालच्या खोलीतील कपाट उचकटत त्यामधील एक लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. आवाज झाल्यामुळे काकडे यांची झोप उघडली. त्यांनी खाली येऊन पाहिले असता तीन चोरटे पळत होते.त्यामधील एका चोरट्याने साडी परिधान केली होती. त्यांनी तिघांचं पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यानी भिंतीवरून उडी घेत पलायन केले. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडी घालून चोरी करण्याची घटना शहरात घडल्याने साडीगॅंग सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे